‘ऑटो एक्स्पो’वर मंदीचे सावट

0
44


कोरोना व्हायरसमुळे चिनी कंपन्यांचीही माघार

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे ७ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान होणा-या ‘ऑटो एक्स्पो’वर मंदीचे सावट आहे. गेल्या वर्षभरापासून देशातील वाहन विक्रीत घसरण झाल्याने वाहन उत्पादकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे यंदा अनेक कंपन्यांनी ‘ऑटो एक्स्पो’तून माघार घेतली आहे.

वाहन बाजारपेठेला चालना देणारा द्वैवार्षिक मेळावा म्हणून भारतातील ‘ऑटो एक्स्पो’ जगभरातील वाहन उत्पादकांना खुणावत असतो. यंदा मात्र भारतातील वाहन उद्योगाची मंदीने अवस्था बिकट केली आहे. सर्वच श्रेणीतील वाहनांच्या विक्रीत मागील वर्षभर घसरण होत आहे. अनेक मोठय़ा कंपन्यांनी उत्पादनात कपात केली आहे. काहींनी कर्मचारी कपात केली. मंदीची सर्वात मोठी झळ सुटे भाग उत्पादकांना बसली आहे.

‘ऑटो एक्स्पो २०१८’ मध्ये ८० वाहने सादर करण्यात आली होती. यंदा त्यात आणखी घट होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. २०१९ मध्ये भारतातील वाहन विक्रीत १३.७७ टक्क्यांनी घसरण झाली. गेल्या २० वर्षातील ही सुमार कामगिरी ठरली. गेल्या वर्षभरात प्रवासी वाहनांच्या विक्रीत १२.७५ टक्के, दुचाकींच्या विक्रीत १४.१९ टक्के आणि व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत १५ टक्के घसरण झाली. त्यामुळे वाहन उत्पादक धास्तावले आहेत.

केंद्र सरकार आणि ‘सियाम’कडून ऑटो एक्स्पोला यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी करत असल्याची माहिती सियामचे महासंचालक सुगातो सेन यांनी दिली. ऑडी, बीएमडब्ल्यू इंडिया, जग्वार लँडरोव्हर यासारख्या कंपन्या यंदा ऑटो एक्स्पोत सहभागी होणार नाहीत.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे चिनी कंपन्यांनी ‘ऑटो एक्स्पो’त सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. ऑटो एक्स्पोमध्ये जवळपास २० टक्के दालन (स्टॉल्स) चीनच्या कंपन्यांनी बुक केली होती. मात्र चिनी कंपन्यांनी माघार घेतल्याने आयोजकांचे नुकसान झाले आहे. बड्या कंपन्या माघार घेत असल्या तरी स्टार्टअप्सनी मात्र ऑटो एक्स्पोला जोरदार प्रतिसाद दिला आहे. यंदा १८ स्टार्टअप्स आपली उत्पादने सादर करणार आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here