अग्रलेख : प्रदूषणाच्या विळख्यात मुंबईकर!

0
52


पर्यावरण मंत्री आणि राज्य सरकारने पर्यावरणप्रेमी असल्याच्या कितीही गप्पा मारल्या आणि आपली अवस्था दिल्लीसारखी होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांकडून शपथा घेतल्या तरीही मुंबईतील प्रदूषित हवा कोणाचेही ऐकण्याच्या आणि नियंत्रणात येण्याच्या परिस्थितीत नाही, हेच खरे. सालाबादप्रमाणे यंदाही राज्यातील सर्वाधिक प्रदूषणाच्या यादीत मुंबईने आपला नंबर कायम ठेवला आहे. भारतातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे हवा गुणवत्तेच्या बाबतीत धोक्याच्या पातळीत आली असून महाराष्ट्रातील २० शहरांचा यात समावेश आहे. मुंबई हे राज्यातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून गणले गेले आहे. मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा राष्ट्रीय गुणवत्ता निर्देशांकापेक्षा तीनपटीने खालावलेला आहे. मुंबईच्या हवेच्या प्रदूषणात मुख्यत: पीएम १० घटकांचे वाढते प्रमाण कारणीभूत आहे. ग्रीनपीस इंडिया या पर्यावरण संस्थेच्या वतीने दरवर्षी पर्यावरणीय अहवाल सादर केला जातो. या वर्षीच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. हवेतील अतिसूक्ष्म कणांबाबत मुंबई शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे. या शहरातील हवेची गुणवत्ता जागतिक आरोग्य संघटनेच्या हवा प्रदूषणाबाबत असलेल्या मानकापेक्षा आठपट अधिक आहे. मुंबईच्या हवेच्या प्रदूषणात मुख्यत: पीएम १० घटकांचे वाढते प्रमाण कारणीभूत असल्याचे ग्रीनपीसच्या अहवालात समोर आले आहे.

मुंबईतील वाढती वाहतूक, वाढती लोकसंख्या, उद्योगधंदे आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या बांधकामामुळे प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असल्याचे दिसून येते. वर्षभरापूर्वी राज्यातील हवेच्या प्रदूषणाच्या अहवालातदेखील मुंबईतील हवेत पीएम घटक आणि नायट्रोजन ऑक्सॉईडच्या उत्सर्जनात वाढ झाल्याचे स्पष्टपणे आढळून आले होते. जगभरात २०१७ साली झालेले १५ टक्के मृत्यू प्रदूषणामुळे झाले, असे ‘ग्लोबल अलायन्स ऑन हेल्थ अ‍ॅण्ड पोल्युशन’ (जीएएचपी) संस्थेने केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे. सुमारे ४०० संस्था आणि ४० देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या जीएएचपी संस्थेत आरोग्य आणि प्रदूषणासंदर्भात अभ्यास केला जातो. त्याच अभ्यासातून हवेतील अतिसूक्ष्म कणांबाबत (पीएम१०) मुंबई शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे. डोंबिवली, चंद्रपूर, उल्हासनगर, ठाणे, पुणे, अमरावती, नागपूर, जालना, लातूर, कोल्हापूर, पिंपरी, चिंचवड, नाशिक, सांगली, जळगाव, अकोला, सोलापूर, नवी मुंबई, औरंगाबाद आणि भिवंडी येथील हवेची गुणवत्ता राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकापेक्षा व जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडापेक्षा आठपट अधिक आहे. ग्रीनपीसच्या अभ्यासानुसार डोंबिवली, ठाणे, पिंपरी, चिंचवड, नवी मुंबई आणि भिवंडी ही शहरे नव्याने मानकापेक्षा अधिक हवा प्रदूषित शहरांच्या यादीत आली आहेत. जीएएचपी संस्थेच्या अहवालानुसार भारत आणि चीन हे देश अशा प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूंमध्ये आघाडीवर आहेत असा धक्कादायक निष्कर्ष या संस्थेच्या अभ्यासातून समोर आला आहे. जगात अचानक ८३ लाख लोकांचा मृत्यू झाला. यापैकी २३ लाख मृत्यूंची भारतात नोंद झाली असून चीनमध्ये १८ लाख मृत्यूंची नोंद झाली. यापाठोपाठ २.७९ लाख मृत्यूंसह नायजेरिया असून इंडोनेशिया आणि पाकिस्तानमध्ये अनुक्रमे २.३२ लाख आणि २.२३ लाख मृत्यूंची नोंद झाली.

अगदी अमेरिकेतदेखील या कारणामुळे २ लाख मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. यावरून जगभरात पसरलेल्या प्रदूषणाच्या समस्येची तीव्रता प्रकर्षाने जाणवते. जीएएचपी संस्थेच्या अहवालानुसार जगात प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूंपैकी तब्बल दोन तृतीयांश मृत्यू केवळ १० देशांमध्ये होतात. या यादीत बांगलादेश, रशिया, इथिओपिया आणि ब्राझील देशांचादेखील समावेश आहे. प्रदूषणामुळे होणा-या ३४ लाख (४० टक्के) अचानक आणि अकाली मृत्यूंचे कारण वाहने आणि उद्योगांमुळे निर्माण होणारे प्रदूषण आहे. या आकडेवारीचा स्वतंत्रपणे अभ्यास केल्यास असे लक्षात येते की, चीनमधील अचानक झालेल्या मृत्यूंचे प्रमाण १२.४२ लाख असून भारतात हा आकडा १२.४० लाख आहे. प्रदूषणाची समस्या डोळ्यासमोर ठेवून, चीनने प्रदूषण करणा-या संस्था आणि उद्योगांविरोधात कडक उपाययोजना केल्या. यामुळे गेल्या दहा वर्षात प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यात चीनने यश मिळविले आहे. भारतात याविरुद्ध परिस्थिती असून, यादरम्यान देशात प्रदूषणाच्या कारणामुळे अचानक होणा-या मृत्यूंचे प्रमाण २३ टक्क्यांनी वाढले आहे. याचे कारण म्हणजे प्रदूषण नियंत्रणाबाबत पुरेशा उपाययोजनांचा अभाव हे स्पष्ट झाले आहे.

देशात होणा-या ८ मृत्यूंपैकी १ मृत्यू वायू प्रदूषणामुळे होतो. त्याचप्रमाणे, प्रदूषित हवेमुळे नागरिकांचे आयुर्मान १.७ वर्षानी कमी झाले आहे, अशी माहिती इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर)च्या अहवालातून गेल्यावर्षी समोर आली होती. विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने दोन वर्षापूर्वी प्रसिद्ध केलेल्या अहवालात, अचानक होणा-या मृत्यूंपैकी ३० टक्के मृत्यूंचे कारण वायू प्रदूषण असल्याचे सांगण्यात आले आहे. रासायनिक कचरा असलेले आणि पाण्यात वाढलेले अन्नपदार्थ नाडी आणि पचन संस्थेसाठी हानिकारक ठरू शकतात, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. यावरून आपली स्वयंपाकघरे प्रदूषणाच्या विळख्यात अडकत आहेत, असे दिसून येते. विषारी होत चाललेले वातावरण मानवी आयुष्यासाठी विनाशकारी ठरत असताना केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर एकात्मिक कृती योजना राबविणे आवश्यक आहे. आशिया पॅसिफिक भागात जर योग्यवेळी प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या नाहीत, तर प्रदूषणाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, असा इशारा आशिया डेव्हलपमेंट बँकेने यापूर्वीच दिला आहे.

या बँकेने २५ वर्षापूर्वीच जल आणि वायू प्रदूषणाचा धोका ओळखला होता. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी इंडियन मेडिकल रिसर्च काऊन्सिल, जागतिक बँक आणि इतर काही संस्थांनी योजना आणि मार्गदर्शक तत्त्वांची निर्मिती केली होती. तथापि, मतभेदांमुळे योजनांची अंमलबजावणी न केल्यामुळे प्रदूषणाच्या समस्येचा सामना करणा-या भारताने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मान व प्रतिष्ठा गमावली आहे. देशातील हवा, जमीन आणि प्राणी कशाप्रकारे हानिकारक झाले आणि पर्यावरण दूषित करत आहे हे इतर कोणीही सांगायची गरज नाही. देशातील अध्र्याहून अधिक नद्यांचे पाणी पिण्यायोग नाही ही बाब सरकारनेच प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आली आहे. गतवर्षी एका आंतरराष्ट्रीय संस्थेने जगभरातील समुद्र २०२५ पर्यंत प्लास्टिकच्या कच-याने भरून गेलेले असतील असा दावा केला होता. त्यामागची कारणे गंभीरपणाने जाणून घेण्याची आवश्यकता आहे.

२०५० पर्यंत जगभरातील सर्व समुद्र, नद्यांमध्ये केवळ प्लास्टिकच्या कच-यांचे प्रमाण समुद्रीजीवांपेक्षाही अधिक असणार आहे. पाण्यासोबत नद्या, नाल्यांमार्गे समुद्रात वाहून जाणारा कचरा समुद्रजीवांना अत्यंत धोकादायक ठरतो आहे. जीवावर उठणा-या सर्वप्रकारच्या प्रदूषणाला संपूर्णपणे मानवी चुका, पर्यावरणावर केलेले अतिक्रमण, वृक्षतोड, रसायनांचा वाढता वापर, बदलती अत्याधुनिक जीवनशैली आदी जबाबदार आहे. सगळेच चित्र एकदम बदलणार नाही, हे मान्य केले तरी किमान आहे त्या प्रदूषणात वाढ होणार नाही यासाठी प्रत्येकानेच सजग असण्याची नितांत गरज आहे. राज्यातील सर्वाधिक प्रदूषणाच्या यादीत मुंबई अव्वल क्रमांकांवर असल्याने मुंबई महापालिका आणि राज्य सरकार यांच्यासोबतच अन्य घटकांनाही याचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here